
मुंबई, 17 एप्रिल (हिं.स.)। आयपीएल २०२६ दरम्यान नियमभंगाचा एक गंभीर मुद्दा समोर आला असून राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजर रोमी भिंडर यांनी डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ही घटना घडली. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयने तात्काळ दखल घेत रोमी भिंडर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि ४८ तासांच्या आत स्पष्टीकरण मागितली होती.
भिंडर यांनी त्यांच्या तब्येतीशी संबंधित काही अडचणींमुळे फोन वापरल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र आयपीएलच्या नियमांनुसार डगआउट परिसरात मोबाईल फोन वापरण्यास स्पष्ट मनाई आहे. संघ व्यवस्थापकांना फोन वापरण्याची परवानगी असली तरी ती फक्त ड्रेसिंग रूमपुरती मर्यादित आहे. त्यामुळे भिंडर यांचा हा प्रकार प्रोटोकॉलचा भंग मानण्यात आला. अँटी करप्शन युनिट त्यांच्या स्पष्टीकरणावर पूर्णपणे समाधानी नसल्याचेही समोर आले.
बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणाची पुष्टी करताना सांगितले की, हा रोमी भिंडर यांचा पहिलाच नियमभंग असल्यामुळे त्यांच्यावर १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांना निलंबनापासून दिलासा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारच्या चुका टाळाव्यात, असा कडक इशाराही देण्यात आला आहे. बीसीसीआयने सर्व संघ व्यवस्थापनांना नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
या वादानंतर आता राजस्थान रॉयल्स संघ पुन्हा खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. १९ एप्रिल रोजी त्यांचा पुढील सामना कोलकाता नाइट राइडर्सविरुद्ध ईडन गार्डन्स येथे होणार असून, संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule