रत्नागिरीच्या वेदशाळा संस्थेत याज्ञिक, वैदिक शिक्षणासाठी प्रवेश
रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : येथील श्री वेदशाळा संस्था येथे येत्या शैक्षणिक वर्षाकरिता ऋग्वेदीय याज्ञिक व वैदिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोकणस्थ, कऱ्हाडे, देवरुखे व देशस्थ ब्राह्मण ज्ञातीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संप
रत्नागिरीच्या वेदशाळा संस्थेत याज्ञिक, वैदिक शिक्षणासाठी प्रवेश


रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : येथील श्री वेदशाळा संस्था येथे येत्या शैक्षणिक वर्षाकरिता ऋग्वेदीय याज्ञिक व वैदिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोकणस्थ, कऱ्हाडे, देवरुखे व देशस्थ ब्राह्मण ज्ञातीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सुमारे १३० वर्षांची परंपरा लाभलेल्या या वेदशाळेत याज्ञिक व वैदिक शिक्षणासाठी निवासी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची उत्तम सोय संस्थेत उपलब्ध असून संस्कृत, वेद व शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करून आर्य संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

याज्ञिक ८ व वैदिक ८ अशा एकूण १६ मर्यादित जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२६ असल्याने वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेची स्थापना १८८५ मध्ये झाली असून संस्थापक कै. विष्णू भिकाजी फडके होते. सुरुवातीला मातीच्या भिंतींची इमारत असलेल्या या संस्थेने पुढे १९८८–८९ मध्ये नवीन सुसज्ज इमारत उभारली आहे. सध्या येथे अभ्यासासाठी सभागृह, विद्यार्थ्यांसाठी खोल्या, भोजनगृह, ग्रंथालय तसेच अध्यापक निवासाची सुविधा उपलब्ध आहे. वेदाभिमानी, सश्रद्ध व धार्मिक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक गुरुकुल पद्धतीत शिक्षण देत अनेक विद्वान घडविण्याचे कार्य संस्था आजही करत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी या संस्थेचे माजी विद्यार्थी धार्मिक कार्य, यज्ञ-याग व पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी वेदमूर्ती केतन शहाणे (७४००१२३२९९) तसेच गणेश लेले (९४२०८४२३७५), संदीप भावे (९४०३४६२१३९), महेश करंबेळकर (९१४५७०५८९१) यांच्याशीही संपर्क साधण्याची सोय उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande