
रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : कोकणात कातळशिल्पे मोठ्या संख्येने आढळली. शिवाय येथे प्राचीन मंदिरे, गुहा असे बरेच काही आहे. हा प्राचीन वारसा जाणून घेण्याकरिता कोकणात प्रथमच रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्रामार्फत पुरातत्त्व या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित केला आहे.
पुरातत्त्व शास्त्राचा परिचय हा अभ्यासवर्ग येत्या २० ते २४ एप्रिल दरम्यान सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विनामूल्य होणार आहे. यामध्ये रत्नागिरीसह चिपळूण, राजापूर, आदी भागांतील विद्यार्थी, अभ्यासक, इतिहास, पर्यटन, संस्कृती आणि धर्म याबाबत उत्सुक असलेल्यांनी नोंदणी केली आहे.
यासंबंधी पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी सांगितले की, कोकणात पुरातत्त्व या विषयावर अभ्यास करण्यासाठी खूप वाव आहे. त्या उद्देशाने कातळशिल्प आणि इतर अनेक गोष्टींवर काम चालू केले. स्थानिक विद्यार्थीमित्रांना हा विषय काय आहे, कसा अभ्यास केला जातो याबाबत माहिती मिळाल्यास येथेच अभ्यासक तयार होतील.
या वर्गामध्ये प्रागैतिहासिक कालखंड, ताम्रपाषाण युग- ऐश्वर्या म्हसे, मंदिर स्थापत्या आणि मूर्तिशास्त्र- डॉ. योगेश प्रभुदेसाई, नाणक शास्त्र आणि पुराभिलेख विद्या- प्रसन्न खानविलकर आणि कोकणातील पुरातत्त्व- ऋत्विज आपटे आदी मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. काणे संस्कृत अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉ. दिनकर मराठे यांच्या सहकार्यामुळे हा वर्ग होत आहे.
पुरातत्त्व शास्त्राची मूलभूत ओळख, उत्खनन पद्धती आणि संशोधनतंत्र, प्राचीन अवशेष, शिलालेख, नाणी यांचा अभ्यास याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी 7507134624 / 9028494199 या क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी