
रत्नागिरी, 19 एप्रिल, (हिं. स.) : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग, शिस्त आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक असून गावातील इंचभर जमीनही गावाबाहेर विकू नका, कारण हीच जमीन भविष्यातील मोठी संपत्ती ठरणार आहे, असे प्रतिपादन आदर्श सरपंच व पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांनी केले.
समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ, गांगणवाडी (ता. राजापूर) यांच्या वतीने आयोजित “यशोगाथा ग्रामविकासाची” या विशेष कार्यक्रमात ग्रामविकासासाठी कार्य करणाऱ्या शिलेदारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार प्रमोद जठार, राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मठकर व सिद्धाली मोरे, तसेच पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या औचित्याने परिसरातील आजी-माजी सरपंचांचा सत्कार करण्यात आला. ग्रामविकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
श्री. पवार यांनी लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा गावाच्या विकासाचा पाया असल्याचे स्पष्ट केले. योग्य नियोजन, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि प्रामाणिक नेतृत्व यांच्या बळावर कोणतेही गाव प्रगत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, निसर्गसंपन्न कोकणामुळे बाहेरील लोक येथे येण्यास उत्सुक असतात; मात्र स्थानिकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते, ही वस्तुस्थिती बदलण्याची गरज आहे. भविष्यात “चाकरमानी” हा शब्दच लोप पावेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
वाढते तापमान, जंगलतोड आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिकचा वाढता वापर ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवरे बाजारच्या विकासप्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, २६ जानेवारी १९९० रोजी सरपंच झालो तेव्हा ग्रामपंचायतीचे उत्पन्न केवळ ३५० रुपये होते. मात्र लोकसहभाग, श्रमदान आणि शिस्त यांच्या बळावर गावात वृक्षलागवड, पाणी व्यवस्थापन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले. दारूबंदी लागू करून सामाजिक शिस्त प्रस्थापित करण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजवण्यासाठी दहावीपर्यंत मोबाइल वापरावर निर्बंध, हरिपाठ आणि व्यायाम सक्तीचे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांमुळे सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण झाले असून हिवरे बाजार हे देशातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
कोकणाला समृद्ध इतिहास लाभला असून येथील गावेही आदर्श गावे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ग्रामविकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी