
बीड, 19 एप्रिल (हिं.स.)।
अंबाजोगाई येथील छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत शाळेच्या १०० टक्के निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या या निकालात ५१ पैकी ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले असून स्वराज बाबासाहेब चौधरी याने ९८.२ टक्के गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. साई सूर्यवंशी आणि विश्वजीत थोरात यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल शाळेत आयोजित विशेष सोहळ्यात डॉ. अनिल मस्के, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर आणि ॲड. संतोष पवार यांच्या हस्ते गुणवंतांचा थाटात गौरव करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष डॉ. ॲड. माधव जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करत हा विजय शिक्षक आणि पालकांच्या खंबीर पाठिंब्याचा परिणाम असल्याचे नमूद केले. शिस्तबद्ध वातावरण आणि शैक्षणिक गुणवत्तेमुळेच अंबाजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्रात शाळेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis