
लातूर, 19 एप्रिल (हिं.स.)।
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त अहमदपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात अभिवादन करण्यात आले. समतेचा संदेश देणाऱ्या या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य महात्मा बसवेश्वर चौक येथे राष्ट्रसंतांचे उत्तराधिकारी राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज व आचार्य गुरुराज स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषद समोरील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज व्यापारी संकुल येथे पुतळा समितीच्या वतीने नियोजित पुतळ्याच्या ठिकाणीही मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या सोहळ्याला माजी मंत्री विनायकराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सांबतात्या महाजन, दिलीपरावजी देशमुख मालक, शिवानंद तात्या हेंगणे, माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, चंद्रकांत मद्दे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis