
लातूर, 19 एप्रिल (हिं.स.)।
भगवान परशुराम जन्मोत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत यंदा तब्बल १५३ रक्तबॅगांचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या १२ वर्षांतील हा सर्वाधिक उच्चांक ठरला असून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळाले.
परशुराम जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रमांची मालिका राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी ७.३० ते दुपारी १२ या वेळेत विवेकानंद संस्कार संस्था, जुना औसा रोड, लातूर येथे रक्तदान शिबिर पार पडले.
यावर्षी समितीने १०१ रक्तबॅगांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र नागरिकांच्या उत्साहामुळे हे उद्दिष्ट ओलांडत अतिरिक्त ५२ बॅगांचे संकलन करण्यात आले आणि शिबिर भव्य यशस्वी ठरले.
शिबिराचे उद्घाटन प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. विश्वासराव कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन परशुराम जन्मोत्सव समिती २०२६ व जाह्नवी प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष देशपांडे, अॅड. संजय पांडे, संजय निलेगावकर, संजय आयाचीत तसेच कार्यकारिणी सदस्य, जाह्नवी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीत उतरवत १५३ नागरिकांनी रक्तदान करून समाजहिताचा आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis