
परभणी, 21 एप्रिल, (हिं.स.)। मोलमजुरी व वडिलोपार्जित पारंपरिक काम करणाऱ्या एका कुटुंबातील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा केल्याची खळबळजनक घटना बालिकेचा गर्भपात झाल्यामुळे उघडकीस आली. या प्रकरणी बोरी पोलीसांत झिरो एफआयआर दाखल झाला असून ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील असल्यामुळे तेथील स्थानिक पोलिसांकडे ही केस हस्तांतरित करण्यात आल्याचे बोरी पोलिसांनी सांगितले.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या बालिकेवर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात घडल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात पीडित बालिकेचा गर्भपात झाल्याने ही घटना उघडकीस आली. या बालिकेचे जवळचे नातेवाईक जिंतूर तालुक्यातील बोरी येथे राहतात. परभणीच्या कोतवाली पोलीसांच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अत्याचारग्रस्त बालिकेचा जिल्हा रुग्णालयात जाऊन जबाब घेतल्याची अशी माहिती मिळत आहे. तर बोरी पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल झिरो एफआयआर दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात मात्र चांगलीच खळबळ सुरू झाली असून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरातील नागरिकांमधून निषेध व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis