
गडचिरोली, 21 एप्रिल, (हिं.स.) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूच्या अवैध साठवणुकीवर आरमोरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ३० हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये सुगंधित तंबाखू, मोबाईल फोन आणि एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश लावण्याचे आदेश दिले आहेत. याच मोहिमेअंतर्गत, १८ एप्रिल २०२६ रोजी आरमोरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, देऊळगाव (ता. आरमोरी) येथील गोपाल निंबेकर याने आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचांसमक्ष निंबेकर याच्या घरावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घराची झडती घेतली असता पोलिसांना तंबाखूचा मोठा साठा मिळून आला.
काय काय झाले जप्त?
तपासणी दरम्यान घराबाहेर उभी असलेली पांढऱ्या रंगाची मारुती वॅगनआर (क्र. MH 33 AC 6256) या गाडीची झडती घेतली असता, त्यातही तंबाखूचे पाकीट आढळले. जप्त केलेल्या मुद्देमालात खालील वस्तूंचा समावेश आहे:
-
हुक्का शिशा तंबाखू (२६८ पाकिटे): किंमत अंदाजे २,९६,९०० रुपये.
-
मजा १०८ बॉक्स व विमल पान मसाला: किंमत अंदाजे ९७,७९० रुपये.
-
मारुती वॅगनआर कार: किंमत अंदाजे ५,००,००० रुपये.
-
मोबाईल व इतर साहित्य: किंमत अंदाजे ३६,३०० रुपये.
-
एकूण मुद्देमाल: ९,३०,९९० रुपये.
-
दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सुरेश तोर्रेम यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोपाल हरीराम निंबेकर (रा. देऊळगाव) आणि वाहन मालक यशवंत विठ्ठल हर्षे (रा. गिलगाव) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्ह्यातील कोणत्याही अवैध व्यवसायाची गय केली जाणार नाही. प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे सत्र सुरूच राहील.
— पोलीस प्रशासन, गडचिरोली
मार्गदर्शन व पथक:सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, श्री. सत्य साई कार्तिक, श्री. गोकुल राज जी. आणि सहा. पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे ठाणेदार श्री. कैलास गवते, पोउपनि. सुरज अनपट, पोउपनि. विजय चलाख व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. विजय चलाख करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond