कुरखेडात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल
गडचिरोली., 21 एप्रिल (हिं.स.)। गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेवर्धा जंगल परिसरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाई
कुरखेडा जुगार


गडचिरोली., 21 एप्रिल (हिं.स.)। गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेवर्धा जंगल परिसरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि कुरखेडा पोलिसांनी संयुक्तरीत्या धाड टाकली. या कारवाईत मुख्य सूत्रधार एजाज शेख ऊर्फ ‘कात्या’ याच्यासह एकूण २२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल ७१ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा येथील एजाज शेख ऊर्फ कात्या हा गेवर्धा जंगल परिसरात काही इसमांना जमवून ताश पत्त्यांच्या साहाय्याने मोठ्या रकमेचा जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी २१ एप्रिल रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. सपोनी भगतसिंग दुल्हत आणि कुरखेडा पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या पथकाने दोन पंचांसह जंगल परिसरात धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच जुगारींमध्ये पळापळ सुरू झाली, मात्र पोलिसांनी घेराव घालून २२ जणांना जागेवरच जेरबंद केले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम: २,७५,२०० रुपये (अडीच लाखांहून अधिक रोख). वाहने: १३ चारचाकी आणि ६ दुचाकी वाहने. इतर साहित्य: २३ मोबाईल संच आणि ५२ ताश पत्ते. असा एकूण ७१,८५,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुख्य आरोपी एजाज रफीक शेख ऊर्फ कात्या (४१, रा. कुरखेडा) याच्यासह सर्व २२ आरोपींविरुद्ध कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सपोनी भगतसिंग दुल्हत, आणि कुरखेडा व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध पोलिसांची ही ‘वज्रमुठ’ यापुढेही अशीच सुरू राहणार असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande