
माद्रिद, २१ एप्रिल, (हिं.स.) गतविजेता कार्लोस अल्काराझने मनगटाच्या गंभीर दुखापतीमुळे या वर्षीच्या फ्रेंच ओपनमध्ये सहभागी न होण्याचे संकेत दिले आहेत. या २२ वर्षीय स्पॅनिश खेळाडूने म्हटले आहे की, पुनरागमनाची घाई करण्याऐवजी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतायचे आहे.
गेल्या आठवड्यात बार्सिलोनाच्या क्ले-कोर्ट स्पर्धेतून अल्काराझला माघार घ्यावी लागली होती, कारण रिटर्न खेळताना त्याच्या मनगटात समस्या निर्माण झाली होती. नंतर, चाचण्यांमध्ये ही दुखापत अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने माद्रिद ओपनमधूनही माघार घेतली, ज्यामुळे १८ मे पासून सुरू होणाऱ्या रोलँड गॅरोसमध्ये त्याच्या सहभागाबद्दल शंका निर्माण झाली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला, खूप लवकर परत येऊन आणखी दुखापत होण्याचा धोका पत्करण्याऐवजी, मी थोडे उशिरा पण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतणे पसंत करेन. तो पुढे म्हणाला, माझी कारकीर्द अजून खूप मोठी आहे. जर मी या रोलँड गॅरोसमध्ये स्वतःवर जास्त दबाव टाकला, तर त्याचा परिणाम भविष्यातील स्पर्धांवर होऊ शकतो.
माँटे कार्लो मास्टर्सच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरकडून पराभूत झाल्यानंतर अल्काराझने आपले जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गमावले. पण, त्याआधी त्याने क्ले कोर्टवर सलग १७ सामने जिंकले होते आणि गेल्या हंगामात रोम व रोलँड गॅरोसची विजेतेपदे पटकावली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे