
नवी दिल्ली, 21 एप्रिल (हिं.स.)आयपीएल २०२६ दरम्यान चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला युवा फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे, १८ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना आयुष म्हात्रेच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. त्याला सहा ते १२ आठवड्यांच्या पुनर्वसनाची आवश्यकता असेल. आम्ही त्याच्या शीघ्र आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान धावताना म्हात्रेच्या हॅमस्ट्रिंगला ताण आला. दुसरी धाव घेताना तो वेदनेने खाली बसला, त्यानंतर फिजिओ तात्काळ मैदानावर पोहोचला. मात्र, तो मैदान सोडून गेला नाही आणि फलंदाजी करत राहिला, पण काही चेंडूंनंतर तो बाद झाला.
आयुष म्हात्रे या मोसमात सीएसकेचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात त्याने उच्च स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याचा फॉर्म सीएसकेसाठी पुढेही महत्त्वाचा ठरला असता. मात्र, तो आता संघाबाहेर गेला असून, हा संघासाठी एक मोठा धक्का आहे.
सामन्यानंतर सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी दुखापतीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, हॅमस्ट्रिंग फाटली आहे. दुखापतीची तीव्रता अद्याप कळलेली नाही, पण ती खूप गंभीर दिसते. तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने हे आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. तो एक उत्कृष्ट युवा क्रिकेटपटू आहे. पण, यामुळे दुसऱ्या क्रिकेटपटूला संधी मिळेल. आमच्याकडे असे अनेक चांगले क्रिकेटपटू आहेत ज्यांना अद्याप संधी मिळालेली नाही.
या हंगामात दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला आयुष म्हात्रे हा सीएसकेचा तिसरा क्रिकेटपटू आहे. खलील अहमद आणि नॅथन एलिस हे देखील संघाबाहेर आहेत. माजी कर्णधार एम.एस. धोनी देखील पोटरीच्या दुखापतीतून सावरत असल्याने एकही सामना खेळलेला नाही.
आयुष म्हात्रेबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्याच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आयुषने सहा सामन्यांतील सहा डावांमध्ये ३३.५० च्या सरासरीने आणि १७७.८७ च्या स्ट्राइक रेटने २०१ धावा केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे