
नवी दिल्ली, 21 एप्रिल, (हिं.स.) - भारतीय महिला संघाची फलंदाज शफाली वर्मा आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवण्याच्या अधिक जवळ पोहोचली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने दोन स्थानांची झेप घेतली असून ती अव्वल १० मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू असून, या मालिकेतील कामगिरीच्या आधारावर दोन्ही देशांच्या खेळाडूंनी क्रमवारीत प्रगती केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेफालीच्या प्रभावी कामगिरीमुळे फलंदाजी क्रमवारीत तिने दोन स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले आहे. स्मृती मंधाना भारताची अव्वल क्रमांकाची फलंदाज कायम आहे. पण ती एक स्थान घसरून चौथ्या स्थानावर आली आहे. हरमनप्रीत कौरनेही दोन स्थानांची झेप घेत संयुक्तपणे ११वे स्थान मिळवले आहे. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नाबाद ४७ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंमध्ये, कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने आपले पाचवे स्थान कायम राखले, तर ॲनेरी डर्कसेनने १८ स्थानांची झेप घेत ३३ वे स्थान पटकावले. सुने लुस ३५ व्या स्थानावर पोहोचली. गोलंदाजांमध्ये सादिया इक्बाल अव्वल स्थानी कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे