परभणी : सेलू शहरात अवैध गुटख्यावर पोलिसांची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
परभणी, 21 एप्रिल, (हिं.स.) - सेलू शहरात अवैध गुटखा विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी किराणा दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहिती
परभणी : सेलू शहरात अवैध गुटख्यावर पोलिसांची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त


परभणी, 21 एप्रिल, (हिं.स.) - सेलू शहरात अवैध गुटखा विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी किराणा दुकान चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक शहरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना शिवाजी चौक परिसरात गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार अजंता कॉलनीतील किराणा दुकान व संबंधित दुकानदाराच्या घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच दुकान चालक हा पसार झाला.

पंचासमक्ष करण्यात आलेल्या पाहणीत दुकान व घरातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठा आढळून आला. यात ४५ हजार ५४० रुपयांचे केसरीयुक्त विमल, ५ हजार ६० रुपयांचे तंबाखू पाउच, ५ हजार ६१६ रुपयांचे प्रीमियम राजनिवास पानमसाला आणि ३ हजार ७४४ रुपयांचे जाफरानी जर्दा असा एकूण ५९ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस हवालदार विलास सातपुते, मुकेश बुधवंत, महिला पोलीस हवालदार आव्हाड, पोलीस अंमलदार उमेश चव्हाण, हनवते यांचा समावेश होता.

या प्रकरणी पोलीस नाईक विष्णू चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकेर शेख करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande