
नवी दिल्ली, 21 एप्रिल (हिं.स) । सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने २०व्या 'आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६' चे प्रक्षेपण हक्क मिळवले आहेत. ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत जपानमध्ये आयोजित केली जाणार आहे.
या करारानुसार, आशिया खंडातील या भव्य क्रीडा सोहळ्याचे प्रक्षेपण संपूर्ण भारत आणि उपखंडात 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क'च्या वाहिन्यांवर केले जाईल, तसेच 'Sony LIV' वर त्याचे थेट प्रसारण उपलब्ध असेल. या प्रक्षेपण क्षेत्रातील दिग्गज कंपनीकडून भारतात आशियाई क्रीडा स्पर्धांचे प्रक्षेपण केले जाण्याची ही सलग तिसरी वेळ असेल.
गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली होती. आणि प्रथमच १०० पदकांचा टप्पा ओलांडला होता. यामुळे बहु-क्रीडा स्पर्धांबद्दल अभूतपूर्व उत्सुकता निर्माण झाली आहे, असे एसपीएनआयचे मुख्य महसूल अधिकारी आणि व्यवसाय प्रमुख राजेश कौल यांनी म्हटले आहे.
जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या बहु-क्रीडा स्पर्धांपैकी एक असलेल्या 'आशियाई क्रीडा स्पर्धे'मध्ये ४१ क्रीडा प्रकारांचा समावेश असेल. यामध्ये ऑलिम्पिकमधील ३२ खेळांचा तसेच 'मिक्स्ड मार्शल आर्ट्स' आणि 'सर्फिंग' यांसारख्या नवीन खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. 'आशियाई क्रीडा स्पर्धेचे जपानमधील ऐची प्रांत आणि नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यत आले आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे