
नांदेड, 25 एप्रिल (हिं.स.)। देगलूर महावितरण विभागाच्या विकासाला गती देणारा निर्णय झाला असून महावितरणच्या नवीन विभागीय कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी तब्बल १ कोटी २६ लाख ७८ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे देगलूरसह परिसरातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम व कार्यक्षम होणार असल्याचे चित्र आहे.
देगलूरचे आ. जितेश अंतापूरकर यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाची तात्काळ दखल घेत निधी मंजूर केला आहे.
नवीन विभागीय कार्यालयाच्या इमारतीमुळे महावितरणच्या कामकाजाला स्वतंत्र व सुसज्ज सुविधा मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना वीजसंबंधित सेवा अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. तसेच, प्रशासनिक कार्यक्षमता वाढून तक्रार निवारण प्रक्रियेलाही गती मिळणार आहे.
दरम्यान, मंजूर निधीच्या प्रक्रियेला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार असून प्रत्यक्ष बांधकाम कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे देगलूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis