
अकोला, 25 एप्रिल (हिं.स.)। देशभरात २७ एप्रिल २०२६ रोजी “गौ सन्मान आवाहन अभियान” राबविण्यात येणार असून अकोला जिल्ह्यातही या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालय, अकोला येथे नागरिक, गोभक्त, पशुप्रेमी व विविध घटकांच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसील कार्यालयासमोरून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत गायीला “राज्यमाता” किंवा “राष्ट्रमाता” दर्जा देण्यात यावा, तसेच देशभरात गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, ही प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, देशातील सुमारे ७८० जिल्हे व ५ हजार तालुक्यांमध्ये एकाच दिवशी निवेदन सादर करून हे अभियान राष्ट्रीय स्तरावर सुरू करण्यात येणार आहे.
हे अभियान कोणत्याही एका संस्था किंवा संघटनेच्या बॅनरखाली नसून गोसंत व गोभक्तांच्या नेतृत्वाखाली राबविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानाचा कालावधी दीड वर्षांचा असून पुढील टप्प्यात आमरण उपोषणासारखी तीव्र आंदोलने करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. अभियानांतर्गत गोआधारित शेती, गोउत्पादन संशोधन, गोशाळा विकास, पंचगव्य उपचार पद्धती, गो-रुग्णालये, गायींचे संरक्षण, महामार्गांवरील अपघातग्रस्त जनावरांसाठी उपचार सुविधा, ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा, तसेच गोसेवेसाठी सीएसआर निधीचा वापर अशा विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत.
तसेच कृषी विद्यापीठांमध्ये शेण व गोमूत्र आधारित संशोधन केंद्रे स्थापन करणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये गोआधारित उत्पादनांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवणे, प्रत्येक राज्यात गो अभयारण्य उभारणे, जिल्हा स्तरावर पंचगव्य रुग्णालये सुरू करणे, शाळा-महाविद्यालयांत देशी गायींचे आर्थिक, वैज्ञानिक व धार्मिक महत्त्व अभ्यासक्रमात समाविष्ट करणे अशा मागण्यांचाही समावेश आहे.
अभियान पूर्णपणे अहिंसक पद्धतीने राबविले जाणार असून संकीर्तन, मोर्चे व लेखी निवेदनांच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेसाठी कोणाकडूनही देणगी किंवा आर्थिक योगदान स्वीकारले जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. सर्व गोभक्त, नागरिक व पशुप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभियानास पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी ७३८५३५०७०१, ९८९०९२२९५७ आणि ९९२१८७५०६८ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे