
अकोला, 25 एप्रिल (हिं.स.) : अकोला शहरातील न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम तब्बल दशकभर रखडल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, उद्धवसेनेने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख (अकोला पूर्व) ज्ञानेश्वर गावंडे यांनी आरोप केला की, “गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असतानाही भाजपचे लोकप्रतिनिधी या उड्डाणपुलासाठी आवश्यक तांत्रिक परवानग्या मिळवण्यात आणि प्रभावी पाठपुरावा करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत.”
राज्यात २०१६ ते २०२६ या कालावधीत बहुतांश काळ भाजपची सत्ता होती, तर केवळ दोन वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तरीही उड्डाणपुलाचा प्रश्न सुटला नसल्याने “सत्ता असूनही काम नाही” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे गावंडे यांनी नमूद केले.
न्यू तापडिया नगर उड्डाणपुलासाठी मंजूर निधीवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. मात्र, प्रत्यक्ष अपयश झाकण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून बॅनरबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “जनतेच्या दैनंदिन अडचणींकडे दुर्लक्ष करून केवळ श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे,” असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, सन २०१६ मध्ये सुरू झालेल्या या उड्डाणपुलाचे काम आजही अपूर्ण असून, नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे