
बीड, 25 एप्रिल, (हिं.स.) - निवडणुकीच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर गेलेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गुरुवारी निर्गमित केले आहेत. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांविना प्रभावित झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक कामकाजाला आता गती मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड, माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी तसेच बीड, केज, शिरूर कासार, आष्टी, माजलगाव, धारूर, वडवणी आणि परळी येथील तहसीलदारांनी निवडणूक कामासाठी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची प्रतिनियुक्ती केली होती. हे शिक्षक सन २०२३ पासून प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. मात्र, दीर्घकाळ शिक्षक शाळेबाहेर असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात कोणतीही निवडणूक प्रक्रिया सुरू नाही. त्यामुळे या प्रतिनियुक्त्या आवश्यक नसल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. यापुढे जनगणना, शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीमुळे मूळ शाळेतील अध्यापनाचे काम प्रभावित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित तहसीलदारांनी या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे. विनापरवानगी प्रतिनियुक्ती केल्याचे आढळल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल. निवडणूक किंवा अन्य महत्त्वाच्या कामांसाठी शिक्षकांची गरज भासल्यास, जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही प्रतिनियुक्ती करता येणार नाही.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis