
नवी दिल्ली, 29 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम बंगालमध्ये आज, बुधवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपन्न झाले. त्यानंतर लगेच एग्झिट पोलची प्रक्रिया सुरू झाली. अनेक मोठ्या निवडणूक सर्वेक्षण संस्थांनी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी एग्झिट पोल जाहीर केले. यापैकी 4 एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर एका एक्झिट पोलमध्ये टीएमसी सत्तेत कायम राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एग्झिट पोलनुसार यावेळी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव निश्चित असल्याचे संकेत आहेत. एग्झिट पोलनुसार भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर बहुमतासाठी 148 जागांची गरज आहे. त्यामुळे या अंदाजानुसार भाजपला पूर्ण बहुमत मिळू शकते. जर हे एग्झिट पोलचे निकाल 4 मे रोजी प्रत्यक्ष निकालांमध्येही दिसले, तर पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. या एग्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 130 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. टीएमसी सत्तेपासून दूर राहू शकते, मात्र मजबूत विरोधी पक्ष म्हणून त्यांची भूमिका राहील. पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी मतदान झाले. यात सुमारे 92 टक्के मतदानांची नोंद करण्यात आली. तर त्यानंतर बुधवारी 29 एप्रिल रोजी देखील राज्यातील 142 जागांवर झालेल्या मतदानाची टक्केवारी देखील 90 टक्क्यांच्या पुढे नोंदवण्यात आली. राज्यातील मतदानाचा वाढता टक्का परिवर्तनाची नांदी असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी यापूर्वीच वर्तवले होते. त्याला आता एक्झिट पोलने दुजोरा दिला आहे. दरम्यान हे सर्व अंदाज प्रत्यक्षात उतरतात का हे 4 तारखेला होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis