कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट कार्यादेश; विभागीय आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर
नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.)। आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाचा वापर करत अज्ञात भामट्याने विभागीय आयुक्तांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीसह खोटे का
कुंभमेळ्याच्या नावाखाली बनावट कार्यादेश; विभागीय आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर


नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.)। आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाचा वापर करत अज्ञात भामट्याने विभागीय आयुक्तांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीसह खोटे कार्यादेश तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी विजय गोरख सोनवणे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा प्रकार उघड झाला. कुंभमेळा २०२७ च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे आणि सुरक्षा व्यवस्था उभारली जाणार असल्याचा फायदा घेत संशयिताने 'नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७' या नावाखाली दोन महत्त्वाची बनावट कागदपत्रे तयार केली. यामध्ये शहरात सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली बसवणे, ती कार्यान्वित करणे आणि देखभाल यासंदर्भातील कार्यादेश तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित सुरक्षा व देखरेख व्यवस्था पुरवण्याबाबत अधिकृत परवानगीपत्राचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या कागदपत्रांवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. हा प्रकार २० जानेवारी २०२६ ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत घडल्याचे निष्पन्न झाले असून, शासनाची दिशाभूल करून आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (१), ३३६ (२), ३३६ (३), ३३८. तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिक, कंत्राटदार व संबंधित संस्थांना कोणतेही कार्यादेश किंवा अधिकृत कागदपत्र स्वीकारण्यापूर्वी त्याची खातरजमा संबंधित शासकीय कार्यालयाकडून करून घेण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande