
मुंबई, 30 एप्रिल (हिं.स.)हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर २४३ धावा करूनही पराभव पत्करावा लागला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने मुंबईचा ६ गडी राखून पराभव केला. हैदराबादचा हा सलग पाचवा आणि या हंगामातील एकूण सहावा विजय होता. तर मुंबईचा आठ सामन्यांमधील हा सहावा पराभव होता. मुंबईने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादसमोर २४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे हैदराबादने १८.४ षटकांत चार गडी गमावून पूर्ण केले. हैदराबादने या मैदानावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग नोंदवला.
हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन होते. हेडने ३० चेंडूंमध्ये ७६ धावा केल्या. त्याच्याशिवाय अभिषेक शर्माने २४ चेंडूंमध्ये ४ धावा केल्या. हेड आणि अभिषेकच्या सलामीच्या जोडीने १२९ धावांची भागीदारी करून हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. गझनफरने ट्रेंट बोल्टकरवी अभिषेकला झेलबाद करून ही भागीदारी तोडली, त्यानंतर हैदराबादचा डाव अडखळला. पुढच्याच चेंडूवर इशान किशन शून्यावर बाद झाला आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने १० व्या षटकात हेडला बाद केले. १३३ धावांत तीन गडी बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेनने डावाची सूत्रे हाती घेतली. संघ जिंकेपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून राहिला आणि ३० चेंडूंमध्ये नाबाद ६५ धावा केल्या.
तत्पूर्वी, सलामीवीर रायन रिकेल्टनच्या वादळी शतकामुळे आणि तीन अर्धशतकी भागीदारींमुळे मुंबईने पाच गडी गमावून २४३ धावा केल्या होत्या. रिकेल्टनने आपल्या कारकिर्दीतील आणि मुंबईच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळीत, ५५ चेंडूंमध्ये आठ षटकार आणि १० चौकारांसह नाबाद १२३ धावा केल्या. याशिवाय, त्याने विल जॅक्स (४६) सोबत पहिल्या विकेटसाठी ९३, नमन धीर (२२) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ५५ आणि कर्णधार हार्दिक पांड्या (३१) सोबत चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.
हैदराबादसाठी प्रफुल्ल हिंगे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ५४ धावांत दोन बळी घेतले, तर इशान मलिंगाने २९ धावांत एक, नितीश कुमार रेड्डीने ३१ धावांत आणि शकिब हसनने ३९ धावांत एक बळी घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे