
नवी दिल्ली, 30 एप्रिल (हिं.स.)आज भारताचा माजी क्रिकेट कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस आहे. जागतिक क्रिकेटमध्ये 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.१९८७ मध्ये जन्मलेल्या रोहितला देशभरातून आणि जगभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहेत. चाहते त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे आणि योगदानाचे कौतुक करत आहेत. या उजव्या हाताच्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे विक्रम प्रस्थापित केले आहेत, जे कोणत्याही क्रिकेटपटूला मोडणे अशक्य आहे. चला तर मग, रोहितच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या विक्रमांवर एक नजर टाकूया.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या - २६४
२०१४ मध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावा केल्या होत्या. जी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या खेळीत त्याने ४२ चौकार मारले होते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहितने बंगळूरुमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद २०९ धावा केल्या. त्याने कोलकातामध्ये श्रीलंकेविरुद्ध २६४ आणि मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध २०८ धावा केल्या आहेत.
एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये, रोहित शर्माने ९ डावांमध्ये ५ शतके झळकावली, जी एकाच स्पर्धेत कोणत्याही खेळाडूने केलेली सर्वाधिक शतके आहेत. इतकेच नाही, तर त्याच्या नावावर एकूण ७ विश्वचषक शतके आहेत.
कर्णधार म्हणून २ आयसीसी ट्रॉफी
रोहित केवळ एक फलंदाजच नाही, तर एक यशस्वी कर्णधारही आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. त्याने १२ महिन्यांच्या आत दोन आयसीसी विजेतेपदे जिंकत पराक्रम केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (६३७) मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे, या विक्रमात त्याने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. केवळ षटकारच नाही, तर रोहित टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे