
अकोला, 06 एप्रिल (हिं.स.) : अकोल्यात एका महिलेने आपल्या साथीदारासह फिर्यादीला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तीन जणांना अटक केली आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला त्याला एका निर्जन ठिकाणी बोलावून तिच्या साथीदारासह अकोल्यातील घुसर रोडवर नेली. येथे खाली उतरल्यावर, आणखी एक वयोवृद्ध महिला आणि एक दुचाकीवरील व्यक्ती आले. त्यांनी स्वतःला आरोपी महिलेचा पती आणि सासू असल्याचा बनाव केला.
या टोळीने फिर्यादीचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तू माझ्या पत्नीसोबत का फिरत आहेस? असे म्हणत त्यांनी फिर्यादीला मारहाण केली आणि त्याची सोन्याची अंगठी काढली. तसेच, त्यांनी फिर्यादीला धमकावले की, जर 2,50,000 रुपये नाही दिले तर त्याचे फोटो व्हायरल करून त्याची बदनामी केली जाईल. फोन पे द्वारे अडीच लाखाची मागणी केल्यानंतर, फिर्यादीने फक्त दहा हजार रुपये ऑनलाइन दिले.
सिव्हिल लाइन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपी 1) नितेश प्रभाकर थोप, 2) लता नितेश थोप, आणि 3) लिलाबाई वसंतराव पाखरे यांना अटक केली आणि त्यांच्याकडून लुटलेल्या वस्तू जप्त केल्या.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याची आणि अशा प्रकारच्या बनावधारकांकडून सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे