
रायगड, 06 एप्रिल (हिं.स.)। पाहुणचाराच्या बहाण्याने घरी बोलावून महिलेच्या पर्समधील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना खोपोली पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास शेडवली येथील मिल्लत नगर परिसरातील हिल व्ह्यू रेसिडेन्सीमधील रूम क्रमांक ५०५ येथे ही घटना घडली. महिला फिर्यादी या संबंधित आरोपींच्या घरी पाहुण्या म्हणून गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या ताब्यातील पर्स घरातील सेफ्यावर ठेवली होती.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादींच्या नकळत व संमतीशिवाय पर्समधील एकूण सुमारे ३ लाख ५१ हजार रुपये किमतीचे ६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच ९० हजार रुपये किमतीचे २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस व इतर दागिने लंपास केले.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)