
रायगड, 06 एप्रिल (हिं.स.)।: पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकने पिकअप गाडीला जोरदार धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 02:30 वाजता मौजे आडोशी गाव हद्दीत, पुणे-मुंबई एक्सप्रेस वेच्या मुंबई लेनवरील खोपोली एक्झिटजवळ (कि.मी. 39.00) हा अपघात घडला. आरोपी चालक (रा. मौदहा बुजुर्ग, ता. पातेपुर, जि. वैशाली, बिहार) याने त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच 15 जीव्ही 7026) अतिवेगाने व निष्काळजीपणे चालवित असताना समोर चाललेल्या पिकअप (क्र. एमएच 12 जीई 3221) वाहनाला मागून जोरदार धडक दिली.धडकेमुळे पिकअप गाडी डिव्हायडरवर आदळून पलटी झाली. या अपघातात ट्रक चालकाला उजव्या हाताला व डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 121/2026 नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281 व 125(a) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार कौशिक फेंगडू करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)