
नवी दिल्ली, ६ एप्रिल (हिं.स.) रविवारी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयावरून वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान आहे, ज्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वास्तविक, सामन्याच्या शेवटच्या षटकात, जेव्हा ऋषभ पंतने जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर चौकार मारला, तेव्हा लखनऊच्या डगआऊटजवळ उभ्या असलेल्या आवेश खानने चेंडूला आपल्या बॅटने मारले. काहींच्या मते, चेंडूने अद्याप सीमारेषा ओलांडली नव्हती. सनरायझर्स हैदराबादला पाच पेनल्टी धावा द्यायला हव्या होत्या आणि पंचांनी नियम २०.१ (डेड बॉल) आणि नियम ४१ (अनफेअर प्ले) लागू करायला हवे होते, अशी चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
क्रिकेट कायद्याच्या तज्ज्ञांच्या मते, आवेश खानची कृती अन्यायकारक आणि अव्यावसायिक असली तरी, ती क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांमध्ये अडथळा मानली जाऊ शकत नाही, कारण त्यावेळी चेंडू थांबवण्यासाठी कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत, अन्यायकारक खेळाचे नियम लागू केले जाऊ शकत नाहीत.त्यावेळची सामन्याची परिस्थिती अशी होती की, लखनऊला विजयासाठी फक्त एका धावेची गरज होती आणि धावसंख्या बरोबरीत होती. एका पंचानेही स्पष्ट केले की, या परिस्थितीत चौकार नाकारण्यास कोणताही आधार नव्हता.
सनरायझर्स हैदराबाद या प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, संघ आपल्या मागील दोन सामन्यांमधील पंचांच्या निर्णयांवर आधीच असमाधानी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिल सॉल्टने हेनरिक क्लासेनला सीमारेषेवर घेतलेल्या झेलवर संघाने आक्षेप घेतल्याची माहिती आहे. २ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातील अभिषेक शर्माच्या बाद होण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. वरुण चक्रवर्तीनेही ब्लेसिंग मुझारबानीच्या झेलवर असमाधान व्यक्त केले आहे.
सनरायझर्सने आपला दुसरा सामना जिंकला असला तरी, २९ मार्च रोजी बंगळूरु येथे खेळला गेलेला सामना त्यांना गमवावा लागला. हे निर्णय किंवा सामन्याचा निकाल बदलण्याची शक्यता नसली तरी, फ्रँचायझी या प्रकरणी बीसीसीआयकडे दाद मागू शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे