
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा सुरळीत लाभ मिळावा यासाठी UDID (युनिक डिसॅबिलिटी आयडी) कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिव्यांग सक्षमीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, सहायक आयुक्त (दिव्यांग सक्षमीकरण) डॉ. तुषार जाधव, तहसीलदार (सं.गा. योजना) गौरी धायगुडे, अधीक्षक शाम धनमने तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि दिव्यांग सेवा प्रतिनिधी उपस्थित होते.
सावरकर यांनी सांगितले की, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, नव्याने सुरू करण्यात आलेले दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तसेच UDID कार्ड आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया सेतू केंद्रांमार्फत जलदगतीने पूर्ण करावी. यासोबतच तालुका व ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन शिबिरे व मेळावे आयोजित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
तालुकानिहाय दिव्यांग बोर्डमार्फत तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करावे तसेच UDID कार्ड मिळण्यात होणारा विलंब कमी करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ज्यांनी UDID कार्ड आधारशी लिंक केले आहे आणि ज्यांचे प्रमाणपत्र कायमस्वरूपी आहे, अशा लाभार्थ्यांना अनुदान सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तात्पुरते प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांनी पुनर्तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासनाने दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केले आहे. कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व योजनांचे अर्ज या पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले आहेत. लाभ घेण्यासाठी यूडीआयडी प्रमाणपत्र आवश्यक असून, ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र आहे त्यांनी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे