दिंडोरीत दुर्दैवी घटनांची मालिका; तीन दिवसांत 10 बालकांचा मृत्यू
Four in two different incidents
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार


दिंडोरी, 07 एप्रिल (हिं.स.) : दिंडोरी तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या तीन दिवसांत घडलेल्या विविध घटनांमध्ये एकूण 10 बालकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी कार विहिरीत कोसळून सहा बालकांसह नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा चार बालकांचा बुडून मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना परमोरी येथे घडली. वरखेडा येथील जनता विद्यालयात शिकणारे समीर रावसाहेब गांगोडे (१४) आणि यश राहुल पगारे (१२) हे विद्यार्थी कादवा नदीत पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्यांच्यासोबत असलेला तिसरा विद्यार्थी सुदैवाने बचावला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रुद्र गणेश जाधव (१३) आणि ओमकार सुनील फटांगळे (१३) हे विद्यार्थी धार्मिक कार्यक्रमासाठी खेरवाडी येथे गेले होते. दुपारी गागरा ओहळात अंघोळीसाठी उतरले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हे दोघेही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. या घटनेची नोंद सायखेडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने पाणीसाठ्यांजवळ सुरक्षेच्या उपाययोजना कडक करण्याची मागणी जोर धरत आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande