
नाशिक, 07 एप्रिल (हिं.स.) : राज्य शासनाने पुन्हा एकदा भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून, त्यात ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर ही दुसरी फेरबदल करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमित रंजन यांची नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमित रंजन यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी (ITDP), पांढरकवडा तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग येथे कार्यरत होते.
दरम्यान, इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्वेता सिंघल यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
तसेच, रुचेश जयवंशी यांची महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे, तर लक्ष्मण राऊत यांची महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
गीतांजली बाविस्कर यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे, तर डॉ. दिलीप जगदाळे यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे. पंकज देवरे यांची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय, मीनल करनवाल यांची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई येथे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य प्रशासनात सातत्याने होत असलेल्या या बदल्यांमुळे विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV