
अमरावती, 07 एप्रिल (हिं.स.) : अमरावती क्राइम ब्रांचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कवर धाड टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील सुकडी मार्गावरून सुरु झालेल्या एमडी (मेफेड्रोन) तस्करीच्या तपासाने राजस्थानातील मुख्य उत्पादन कारखान्यापर्यंत पोहोच साधली.
राजस्थानातील दुर्गम भागातील कारखान्यात मांगीलाल गनपत सिंघावत (वय 45, डिंडवाना, राजस्थान) आणि त्याचा साथीदार विष्णु गायरी यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे देशभरात पसरलेल्या ड्रग्स रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 8 मार्च रोजी झाली, जेव्हा पोलिसांनी अब्दुल फहीम आणि शेख अयान यांना 2.79 किलो एमडी ड्रग्ससह अटक केली होती. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तपास मुंबईतील मुख्य तस्कर अजीम कडे वळला, ज्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी राजस्थानातील आंतरराष्ट्रीय टोळीपर्यंत पोहोच साधली.
क्राइम ब्रांचच्या पथकाने गेल्या एका महिन्यात 4,000 किलोमीटरचा प्रवास करत गुप्तपणे तपास केला. दुर्गम भाग, बीहड परिसर आणि अरुंद गल्लीबोळांमध्ये संशयितांचा पाठलाग करून पोलिसांनी मांगीलाल आणि विष्णु यांना जेरबंद केले. आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
अमरावती पोलिसांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे ड्रग्स माफियांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याला मोठा धक्का बसला असून, भविष्यात अशा गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या देखरेखीखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ, सपोआ गुन्हे शिवानी बचाटे, तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी