कोल्हापुरात नवकार महामंत्र पठण; जागतिक शांततेचा संदेश देणारा भव्य उपक्रम
कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.) : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना सर्वत्र शांती आणि सद्भाव निर्माण करण्याची ताकद भारतीय विचारसरणीत आणि नवकार महामंत्रात आहे. हा मंत्र समाजमंत्र बनून भारताची जागतिक पातळीवरील विधायक ओळख ठरावी, अशा भावना आ
नवकार महामंत्र सामुदायिक पठण


कोल्हापूर, 09 एप्रिल (हिं.स.) : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असताना सर्वत्र शांती आणि सद्भाव निर्माण करण्याची ताकद भारतीय विचारसरणीत आणि नवकार महामंत्रात आहे. हा मंत्र समाजमंत्र बनून भारताची जागतिक पातळीवरील विधायक ओळख ठरावी, अशा भावना आचार्य विजय अभय शेखर सुरिश्वर (श्री लक्ष्मी सेन महास्वामीजी) यांनी व्यक्त केल्या.

भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) तर्फे जगभरातील 130 ठिकाणी आणि भारतातील 8 हजारांहून अधिक ठिकाणी नवकार महामंत्र सामुदायिक पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम महासैनिक दरबार हॉलमध्ये झाला.

जगभरात युद्ध, दहशतवाद आणि हिंसाचार वाढत असताना विश्वात शांतता आणि आनंद प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात तीन कोटींहून अधिक लोक सहभागी झाले. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्या वेळी एक कोटी आठ लाख लोकांनी एकाच वेळी पठण करून विश्वविक्रम नोंदवला होता. तसेच 9 एप्रिल हा ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती जितो कोल्हापूर चॅप्टरचे अनिल पाटील यांनी दिली.

नवकार महामंत्र हा जैन धर्मातील अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र मानला जातो. या मंत्राद्वारे अरिहंत, साधू आणि उपाध्याय यांना वंदन केले जाते, ज्यामुळे आत्मकल्याण साध्य होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते. भविष्यात या उपक्रमाची व्याप्ती अधिक वाढवण्याचा निर्धार रवी संघवी यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी जैन समाजाच्या देशाच्या विकासातील योगदानाचे कौतुक केले, तर महापौर रूपाराणी निकम यांनी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी परिसरासह कर्नाटकातील जैन बांधवांनी विविध मंदिरांमध्ये एकत्र येऊन सामूहिक पठण केले.

दिल्ली येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले असून, त्याचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात 34 हजारांहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी संजय घोडावत ग्रुपचे प्रायोजकत्व लाभले होते. जितो कोल्हापूर चॅप्टरचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande