पुणे : बोगस औषधांमुळे आंबा-काजू बागांचे नुकसान; भरपाईची मागणी
पुणे, 9 एप्रिल (हिं. स.) : औषध कंपन्यांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट आणि चुकीच्या औषधांमुळे कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी आ
कृषी आयुक्तालयातील बैठक


पुणे, 9 एप्रिल (हिं. स.) : औषध कंपन्यांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट आणि चुकीच्या औषधांमुळे कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी आयुक्तांकडे केली.

पुण्यात कृषी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील आंबा व काजू उत्पादक शेतकरी यंदा अस्मानी आणि सुल्तानी संकटाचा सामना करत आहेत. बोगस व निकृष्ट खते, कीटकनाशके, पीजीआर आणि बुरशीनाशके यांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या प्रकरणी संबंधित औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करून तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत कृषी विभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, औषध कंपन्यांच्या दरांवर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नसून, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन न दिल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी यंदा सुमारे 300 कोटी रुपयांची औषधे खरेदी केली असून, आंबा पिकासाठी 70 हून अधिक कंपन्यांची औषधे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, या औषधांच्या किमतींमध्ये मोठी तफावत असून, रोख खरेदीवर 60 ते 65 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते, ही बाबही संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले.

गुणनियंत्रण विभागाकडून मर्यादित तपासणी होत असल्यामुळे बनावट औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

रत्नागिरीचे माजी आमदार बाळा माने यांनी संशोधन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आंबा पिकावरील कीडरोग नियंत्रणासाठी नेमके काय संशोधन झाले, तसेच बनावट कंपन्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती देण्याची मागणी केली. 1990 पासून फळबाग लागवडीसंदर्भात नाविन्यपूर्ण संशोधनाचा अभाव असल्याचाही त्यांनी आरोप केला.

या बैठकीला गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande