
रायगड, 01 मे (हिं.स.)। े : ख्राईस्ट (डीम्ड टू बी) विद्यापीठाच्या पुणे लवासा कॅम्पसमध्ये मार्च आणि एप्रिल २०२६ दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.
स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘XUBRENZ 2026’ या राष्ट्रीय व्यवस्थापन महोत्सवात देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. “Matrix” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात फायनान्स, मार्केटिंग, एचआर आणि बिझनेस अॅनालिटिक्स विषयांवरील स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच डेटा अॅनालिटिक्स क्षेत्रातील संधींबाबत JP Morgan Chase चे डेटा अॅनालिस्ट आणि माजी विद्यार्थी देब्तानू बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
इंग्रजी आणि सांस्कृतिक अध्ययन विभागाने “Text Meets Tech” या कार्यक्रमातून डिजिटल ह्युमॅनिटीजची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. तर ‘Gladiator’26’ या आंतरविभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, टीमवर्क आणि एकोपा वाढीस लागला.
स्कूल ऑफ लॉच्या ‘VINK Vista 2026’ कार्यक्रमात लोकशाही, घटनात्मक मूल्ये आणि पत्रकारिता स्वातंत्र्य यांसारख्या विषयांवर चर्चासत्रे झाली. विद्यार्थ्यांसाठी लेखन आणि क्विझ स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.
विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या ‘Nritta’ या नृत्य महोत्सवात शास्त्रीय, लोककला आणि अर्बन डान्स शैलींचे सादरीकरण झाले. UNDER25 टीमने आयोजित ‘Ghazal-e-Shaam’ या सूफी संगीतमय कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आनंदाची अनुभूती दिली.
क्रीडा विभागाने आयोजित ‘CHRI-SPO’26’ स्पर्धेत महाराष्ट्रभरातील ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. महिला व्हॉलीबॉल आणि पुरुष फुटसल संघांनी विजेतेपद पटकावले. याशिवाय सेंटर फॉर सोशल ॲक्शनतर्फे मुघाव येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले, तर ‘NARRA’ या उपक्रमातून समावेशकता आणि संवादाला प्रोत्साहन देण्यात आले. विविध उपक्रमांमुळे ख्राईस्ट विद्यापीठाचा लवासा कॅम्पस शैक्षणिक आणि सांस्कृतिक उर्जेने भारलेला दिसून आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)