
रत्नागिरी, 1 मे, (हिं. स.) : पालकमंत्री उदय सामंत यांनी स्व-गणना करून जिल्ह्यातील जनगणनेचा आरंभ आज पोलीस संचलन मैदानावर केला. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून रत्नागिरी जिल्हावासीयांनी जनगणनेत सामील व्हावे आणि स्वगणना पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
पोलीस संचलन मैदानावर महाराष्ट्र दिन ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांनी जनगणना सेल्फी पॉइंट येथे येऊन त्यांनी स्वगणना केली. यानंतर ते म्हणाले, मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करायचे आहे. स्वगणना आज 1 मे पासून 15 मेपर्यंत पूर्ण देशामध्ये होत आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील लोकांनीदेखील सामील झाले पाहिजे. केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०११ नंतर ही जनगणना आता पहिल्यांदा होत आहे. त्यामध्ये एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून आपण सर्वांनी सामील व्हावे.यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी