नेरळमध्ये कचरा व्यवस्थापनावरून नागरिक आक्रमक
ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकून आंदोलन रायगड, 01 मे (हिं.स.) :नेरळ ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात वॉर्ड क्रमांक ९ मधील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले. अनेक दिवसांपासून कचरा उचल
Citizens-angry-over-non-pickup


ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकून आंदोलन

रायगड, 01 मे (हिं.स.) :नेरळ ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात वॉर्ड क्रमांक ९ मधील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकून आंदोलन केले. अनेक दिवसांपासून कचरा उचलणारी घंटागाडी बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, २३ एप्रिल ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत कचरा उचलला गेला नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या गेटसमोर कचरा टाकून निषेध नोंदवला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

शिवसेना उपशहर प्रमुख संदीप नारायण उतेकर यांनीही ग्रामपंचायत प्रशासनावर टीका करत कचरा व्यवस्थापन तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.

दरम्यान, कचरा वेळेत न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा जनआक्रोश आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

---------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande