माथेरानमध्ये व्यावसायिक गॅस दरवाढीचा फटका; छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात
रायगड, 01 मे (हिं.स.) :पर्यटननगरी माथेरानमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीमुळे हॉटेल चालक, हातगाडीधारक आणि लहान स्टॉल व्यावसायिक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढत्या खर्चामुळे “व्यवसाय चालवायचा की बंद करायचा?” असा प्रश्न त्यांच्यास
चुली


रायगड, 01 मे (हिं.स.) :पर्यटननगरी माथेरानमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीमुळे हॉटेल चालक, हातगाडीधारक आणि लहान स्टॉल व्यावसायिक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढत्या खर्चामुळे “व्यवसाय चालवायचा की बंद करायचा?” असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

सध्या माथेरानमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असून, एका सिलेंडरची किंमत सुमारे ३ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांतच जवळपास १ हजार रुपयांची वाढ झाल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उन्हाळी पर्यटन हंगामातच खर्च वाढल्याने आर्थिक ताळमेळ बिघडल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

वाहनबंदी असलेल्या माथेरानमध्ये मालवाहतुकीचा खर्च आधीच जास्त आहे. त्यात गॅस दरवाढीचा अतिरिक्त भार आल्याने लहान हॉटेल्स आणि स्टॉलधारकांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यावसायिकांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत “गॅसऐवजी ऑक्सिजनवर जगायची वेळ येईल” असे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर माथेरानमधील व्यावसायिक संघटना आणि हॉटेल असोसिएशन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ निवेदनांऐवजी प्रत्यक्ष आंदोलनाची गरज असल्याची भावना व्यावसायिकांमध्ये वाढत आहे.

दरम्यान, माथेरानसारख्या पर्यटनस्थळासाठी विशेष सवलत देऊन लहान व्यावसायिकांना घरगुती गॅस वापरण्याची तात्पुरती परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा अनेकांना पुन्हा लाकडाच्या चुलीवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

“सरकारने तातडीने हस्तक्षेप न केल्यास लहान व्यावसायिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे माजी वन संवर्धन समिती सदस्य नितीन विश्वनाथ सावंत यांनी सांगितले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande