
लातूर, 01 मे (हिं.स.)। : देशाच्या भविष्यातील विकासाचे अचूक नियोजन करण्यासाठी जनगणना प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच 'स्व-गणना' ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. त्यांच्या उपस्थितीत स्व-गणना मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
१ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना घरबसल्या स्वतःच्या कुटुंबाची माहिती नोंदवता येणार आहे. यासाठी नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन कुटुंब प्रमुखाच्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा माहिती यशस्वीरीत्या भरली की, नागरिकांना एक 'SE ID' प्राप्त होईल. १६ मे पासून जेव्हा शासकीय प्रगणक घरोघरी भेटी देतील, तेव्हा त्यांना केवळ हा 'आयडी' दाखवल्यास जनगणनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून माहितीमध्ये अचूकता राहण्यास मदत होणार आहे.
जनगणनेच्या या पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे घरांची माहिती संकलित केली जाणार असून, दुसरा टप्पा २०२७ मध्ये पार पडेल. प्रशासनाकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची नागरिकांनी अचूक उत्तरे द्यावीत आणि या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे. आपली अचूक नोंदणी, हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे नियोजन आहे, असे नमूद करत पालकमंत्र्यांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis