लातूर - पोलिसांचा महामार्गावर थरारक 'डेमो'; अपघात रोखण्यासाठी अनोखी जनजागृती
लातूर, 01 मे (हिं.स.)। राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना लगाम घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या मनावर रस्ते सुरक्षेचे गांभीर्य बिंबवण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी एक आगळावेगळा प्रयोग राबवला आहे. ही केवळ एक अपघातग्रस्त कार नाही, तर एका च
पोलीसांची जनजागृती


लातूर, 01 मे (हिं.स.)। राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना लगाम घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या मनावर रस्ते सुरक्षेचे गांभीर्य बिंबवण्यासाठी अहमदपूर पोलिसांनी एक आगळावेगळा प्रयोग राबवला आहे. ही केवळ एक अपघातग्रस्त कार नाही, तर एका चुकीचा परिणाम आहे अशा आशयाचा फलक लावून, महामार्गाच्या मधोमध प्रत्यक्ष अपघातग्रस्त कारचा सांगाडा उभा करण्यात आला आहे. पोलिसांच्या या बोलक्या उपक्रमाने वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतले असून परिसरात याची मोठी चर्चा होत आहे.

अपघाताची भीषणता डोळ्यासमोर

अहमदपूर-नांदेड रोडवरील मरशिवनी फाट्याजवळ असलेल्या साई पेट्रोलियम पंपासमोर हा 'डेमो' तयार करण्यात आला आहे. एका लोखंडी स्टॅन्डवर भीषण अपघातात चक्काचूर झालेली कार ठेवून, त्याद्वारे वेगावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश दिला जात आहे. महामार्गावरून येणारे-जाणारे चालक जेव्हा ही कार पाहतात, तेव्हा त्यांना वेगाच्या अतिरेकाचा काय परिणाम होऊ शकतो, याची जाणीव क्षणार्धात होत आहे.

पोलिसांचा कळकळीचा संदेश : -

या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवरून पोलिसांनी अत्यंत महत्त्वाचे संदेश दिले आहेत .

तुमच्या कुटुंबाची धरा आस, सीट बेल्ट लावून करा सुरक्षित प्रवास.

* वेगावर ठेवा नियंत्रण, सीट बेल्ट लावून टाळा मृत्यूचे निमंत्रण. * वेग आवरा, आयुष्य वाचवा!

अनेकदा केवळ दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांमध्ये सुधारणा होत नाही, हे लक्षात घेऊन अहमदपूर पोलिसांनी हा 'इम्पॅक्ट' देणारा उपक्रम राबवला आहे. केवळ फलक न लावता प्रत्यक्ष अपघातग्रस्त गाडी समोर ठेवल्यामुळे चालक अधिक सतर्क होत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, यामुळे महामार्गावरील अपघातांच्या संख्येत घट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande