
लातूर, 12 मे (हिं.स.)।लातूर शहरातील ट्यूशन एरियात शिक्षणासाठी राहणाऱ्या एका तरुणीचा सोशल मीडियाद्वारे पाठलाग करून तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत जबरदस्ती केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणीला चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर तालुक्यातील पश्चिम भागातील पीडित तरुणी शहरातील एका हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत आहे. तिच्याच गावातील दोन तरुणांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ओळख वाढवत त्यांनी प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियावरून सतत पाठलाग सुरू केला.
यानंतर आरोपींनी “आमचे तुझ्यावर प्रेम आहे” असे सांगत तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडितेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपींनी त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर ट्यूशन एरियातील हॉस्टेलपासून अशोक हॉटेल चौकातील ट्रॅव्हल्स पॉईंटपर्यंत पाठलाग करत तिला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पीडित तरुणी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने आरोपींवर विनयभंग, शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती, अपहरणाचा प्रयत्न तसेच ऍट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यान्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, लातूरच्या ट्यूशन एरियात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis