नाशिक कुंभमेळा प्राधिकरणात बनावट कार्यादेशांचा धक्कादायक प्रकार
नाशिक, 12 मे (हिं.स.) :नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित बनावट कागदपत्रे आणि कार्यादेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नावाने यापूर्वी 70 कोटी रुपय
एफआईआर लोगो


नाशिक, 12 मे (हिं.स.) :नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित बनावट कागदपत्रे आणि कार्यादेश तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नावाने यापूर्वी 70 कोटी रुपयांच्या दोन कामांचे बनावट वर्क ऑर्डर तयार झाल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्याच संशयिताने पुन्हा बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांच्या आधारे तब्बल 4 कोटी रुपयांचा कार्यादेश जारी केल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात ठाणे येथील इनोव्हेटीव्ह इंटेलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्यूशन एजन्सीचे संचालक व संस्थापक अभिषेक संजय झरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती तसेच त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराशी संबंधित कामांसाठी बनावट कार्यादेश तयार करण्यात आले होते. या आदेशांवर कुंभमेळा आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरण्यात आले.

याआधीही आरोपीने कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून सुमारे 70 कोटी रुपयांचा सीसीटीव्ही आणि एआय आधारित सुरक्षा प्रकल्प मंजूर झाल्याचा दावा केला होता. मात्र कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात नाशिकरोड पोलिसांनी अभिषेक झरे याला अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयातील सहाय्यक संशोधन अधिकारी विशाल पाटील यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.---------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande