
छत्रपती संभाजीनगर, 13 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च 2026 च्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना “राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार” योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येकी रुपये 5 हजार इतकी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. त्यामध्ये शाळेचे निकालपत्र, शाळेचे शिफारसपत्र, इयत्ता 10 वी/12 वी गुणपत्रक, जातीचा दाखला, बँक पासबुकाची छायांकित प्रत, आधार कार्ड प्रत आदी कागदपत्रांचा समावेश असावा.
यासंबंधीचे प्रस्ताव संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांच्यामार्फत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, हिंगोली येथे सादर करण्यात यावेत, असे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis