इराणला खोटी आशा देणे म्हणजे देशद्रोहासारखे, ट्रम्प यांचा माध्यमांवर संताप
वॉशिंग्टन, 13 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांवर जोरदार टीका केली. काही वृत्तांमध्ये इराण युद्धात चांगली कामगिरी करत असल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी पुन्हा दावा करत म्हटले की, इराणी सैन
इराणला खोटी आशा देणे म्हणजे देशद्रोहासारखे, ट्रम्प यांचा माध्यमांवर संताप


वॉशिंग्टन, 13 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांवर जोरदार टीका केली. काही वृत्तांमध्ये इराण युद्धात चांगली कामगिरी करत असल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी पुन्हा दावा करत म्हटले की, इराणी सैन्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. इराणचे नेते संपले असून देश गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.

ट्रम्प यांनी हे वक्तव्य ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केले. त्यांनी माध्यमांवर इराणला “खोटी आशा” देण्याचा आणि त्याची “मदत” करण्याचा आरोप केला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “जेव्हा फेक न्यूजमध्ये असे सांगितले जाते की इराण आमच्याविरोधात लष्करीदृष्ट्या चांगली कामगिरी करत आहे, ते जवळपास देशद्रोहासारखे आहे. कारण ते पूर्णपणे खोटे आणि हास्यास्पद आहे. ते शत्रूची मदत करत आहेत. त्यामुळे इराणला फक्त खोटी आशा मिळत आहे, पण अशी कोणतीही आशा असू नये. हे अमेरिकन भ्याड आहेत, जे स्वतःच्या देशाविरोधात उभे आहेत.”

त्यांनी दावा केला की, इराणकडे १५९ नौदल जहाजे होती आणि आता ती सर्व समुद्रात बुडाली आहेत. “इराणकडे आता नौदलच उरलेले नाही. त्यांचे हवाई दल संपले आहे. त्यांचे तंत्रज्ञान नष्ट झाले आहे. त्यांचे नेते आता राहिलेले नाहीत आणि देश आर्थिक विनाशाचा सामना करत आहे. फक्त पराभूत, कृतघ्न आणि मूर्ख लोकच अमेरिकेविरोधात बोलू शकतात,” असे ट्रम्प म्हणाले. हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे.

चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा दावा केला की इराणी सैन्य पूर्णपणे कमकुवत झाले असून अमेरिका हे युद्ध “शांततेने किंवा कोणत्याही मार्गाने” जिंकेल. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, इराणच्या मुद्द्यावर ते राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून मदतीची अपेक्षा करत आहेत का, तेव्हा ट्रम्प म्हणाले, “नाही, मला वाटत नाही की इराणच्या बाबतीत आम्हाला कोणत्याही मदतीची गरज आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहोत. आम्ही हे शांततेने किंवा इतर कोणत्याही मार्गाने जिंकू. त्यांचे नौदल संपले आहे. त्यांचे हवाई दल संपले आहे. त्यांची संपूर्ण युद्धशक्ती नष्ट झाली आहे.”

इराणविषयी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “इराण लष्करीदृष्ट्या पराभूत झाला आहे.त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा उरलेले काम आम्ही पूर्ण करू.” अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इराणवरील नाकेबंदी “१०० टक्के प्रभावी” असल्याचाही दावा केला. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर टीका केली. वॉशिंग्टनच्या कृतींवरील विश्वासाचा अभाव हा शांतता प्रस्थापित होण्यातला सर्वात मोठा अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमानुसार, तेहरानमध्ये नॉर्वेच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान अराघची यांनी हे वक्तव्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande