लातूर एमआयडीसीतील सुजाता इंडस्ट्रीजला भीषण आग; लाखोंचे नुकसान
लातूर, 13 मे (हिं.स.)। शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत ‘मे. सुजाता इंडस्ट्रीज’ या कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज आहे. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदा
भीषण आग


लातूर, 13 मे (हिं.स.)। शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत ‘मे. सुजाता इंडस्ट्रीज’ या कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज आहे. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर एमआयडीसी भागातील पांडुरंग मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या एमआयडीसी ए-१५ प्लॉटवर चेतन बोथरा यांच्या मालकीची ‘मे. सुजाता इंडस्ट्रीज’ ही कंपनी आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात पट्टे, रद्दी साहित्य तसेच एमएस स्क्रॅपचा साठा करण्यात आला होता. मंगळवारी रात्री साधारणपणे ९:५९ वाजण्याच्या सुमारास अचानक कंपनी परिसरातून धूर आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक श्री. सोलनकर यांनी तातडीने लातूर महानगरपालिका अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागवली. आग भीषण स्वरूपाची असल्याने अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. तीन अग्निशमन गाड्यांनी काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे काम सुरू केले.

कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्य असल्याने आग झपाट्याने पसरत होती. त्यामुळे आजूबाजूच्या इतर उद्योगांनाही मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

या बचाव मोहिमेत प्रभारी अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धनराज कांदे, ओंकार मानकर, शरद माने, निलेश बुरपुले (प्रभारी यंत्रचालक), पंकज गायकवाड, हसन शेख आणि मुकुंदा देशमुख (यंत्रचालक) यांनी धाडसी कामगिरी बजावत आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

प्राथमिक माहितीनुसार, फटाक्यांच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचे कंपनी मालकांनी सांगितले आहे. आगीत कंपनीतील साहित्य, स्क्रॅप व इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर एमआयडीसी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आग नियंत्रणात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande