
लातूर, 15 मे (हिं.स.)।
NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई व्हावी — भाजयुमोची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. भाजयुमोचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष ओमअप्पा शिवमुर्ती धरणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
भाजयुमोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे घेतलेली मेहनत, पालकांनी केलेला आर्थिक खर्च आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेला विश्वास या घटनेमुळे डळमळीत झाला आहे. या प्रकारामुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींना कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नाशिक आणि कोल्हापूरनंतर आता या प्रकरणात लातूरचे नाव चर्चेत येत असल्याने संबंधित प्रश्नपत्रिका, हस्ताक्षर, कागदपत्रे आणि इतर पुरावे यांची न्यायवैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजयुमोच्या वतीने करण्यात आली. तसेच या गैरप्रकाराचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याशी संबंधित मध्यस्थ, खाजगी क्लासेस चालक, वसतिगृह चालक तसेच इतर संबंधित व्यक्तींनाही तपासाच्या कक्षेत आणावे, अशी मागणी करण्यात आली.
पेपरफुटीसारखा गंभीर प्रकार हा देशाच्या भविष्यासोबत केलेला विश्वासघात असून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्यांना कोणतीही माफी मिळू नये, अशी भूमिका भाजयुमोने स्पष्ट केली. संपूर्ण रॅकेट उघड करून संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष ओमअप्पा धरणे म्हणाले, “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी मिळू नये. निष्पक्ष तपास होऊन संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
या वेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ओमअप्पा धरणे, सरचिटणीस अक्षय स्वामी, उपाध्यक्ष धीरज मोरे, गणेश बेद्रे, मंडळाध्यक्ष रोहित चवळे, चिटणीस सचिन गुट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis