
पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची उचलबांगडी
नाशिक, 15 मे (हिं.स.) : नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य मानवी हक्क आयोग कडे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या बदल्यानंतर पोलिस प्रशासनात विविध चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान भोंदु अशोक खरात याच्या व्यासपीठावर कराळे यांनी भाषण दिल्यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे पोलिस वर्तुळात बोलले जात आहे
अलीकडेच कराळे हे अशोक खरात यांच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित असल्याचे काही छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण केल्याचाही उल्लेख करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू असल्याची चर्चा काही स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्रात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी नियंत्रण आणि विविध सामाजिक प्रश्नांवर पोलिस यंत्रणेची भूमिका प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या काही निर्णयांवर आणि सार्वजनिक कार्यक्रमांतील उपस्थितीवरून टीकाही झाली होती.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले प्रवीण पडवळ हे अनुभवी अधिकारी मानले जातात. राज्यातील विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV