
नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.) : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजी परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की पुढील वर्षापासून नीट यूजी परीक्षा संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. सरकार स्वच्छ, पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणालीसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत प्रधान यांनी आश्वासन दिले की परीक्षेत अनुचित मार्गांचा वापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा गटाला कोणतीही सूट दिली जाणार नाही. गेल्या 3 मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर काही अनियमितता समोर आल्यानंतर री-एक्झामची घोषणा करण्यात आली असून ही परीक्षा आता 21 जून रोजी घेतली जाईल. एनटीएने या तारखेची अधिकृत घोषणा तपासानंतर केली आहे. तसेच प्रधान म्हणाले की 7 मे रोजी नीट यूजी पेपर लीकबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर सरकारने अधिकृत चौकशी सुरू केली. प्राथमिक तपासात 12 मे पर्यंत असे समोर आले की प्रश्नपत्रिका ‘गेस पेपर’ नेटवर्कच्या आडून लीक करण्यात आली होती. पात्र आणि योग्य विद्यार्थ्यांवर याचा कोणताही परिणाम होऊ नये याला सरकार प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेतील पारदर्शकतेवर भर देत त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देखील प्रधान यांनी दिली.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी