
- दुधाच्या भाववाढीनेही दिला सामान्यांना झटका
नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.) : केंद्र सरकारने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.25 रुपयांची वाढ जाहीर केली असून, त्यामुळे महागाईचा आणखी एक मोठा झटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. नवीन दर शुक्रवारपासून लागू करण्यात आले आहेत.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये प्रतिलिटर झाला असून, डिझेल ८७.६७ रुपयांवरून ९०.६७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल १०६.६८ रुपये तर डिझेल ९३.१४ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्येही इंधन दरांनी शंभरीच्या जवळपास मजल मारली आहे.आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळसारख्या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर ११० रुपयांच्या पुढे गेले असून, अनेक राज्यांत डिझेलही १०० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.दरम्यान, दिल्ली-एनसीआर परिसरात सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो, कॅब आणि खासगी वाहनांच्या खर्चात वाढ होणार असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या बजेटवर होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातही सीएनजीचे दर ८४ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले आहेत.
महागाईचा आणखी एक फटका म्हणजे मदर डेअरीने दुधाच्या किमतीत प्रतिलिटर २ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारातील परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विविध प्रकारच्या दुधाचे नवे दर लागू झाले आहेत.
प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवे दर (प्रति लिटर)
नवी दिल्ली – ९७.७७ रुपये
मुंबई – १०६.६८ रुपये
कोलकाता – १०८.७० रुपये
चेन्नई – १०३.६७ रुपये
हैदराबाद – ११०.८९ रुपये
जयपूर – १०७.९७ रुपये
पटणा – १०८.५५ रुपये
तिरुवनंतपुरम – ११०.५८ रुपये
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र झाले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून, ब्रेंट कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
तथापि, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाढत्या जागतिक संकटातही भारताने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंड पुरवठा कायम ठेवला असल्याचा दावा त्यांनी केला.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule