परंपरेला नवा अर्थ; लग्नात 'फेट्या'ऐवजी 'पुस्तकांचा' मान
गिते आणि आंधळे परिवाराचा आदर्श उपक्रम; ७०० पाहुण्यांना विचारांची शिदोरी सिन्नर, 15 मे (हिं.स.)। - लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, पाहुण्यांच्या नावाचा बडेजाव आणि स्टेजवर होणारी गर्दी. मात्र
New meaning to tradition


गिते आणि आंधळे परिवाराचा आदर्श उपक्रम; ७०० पाहुण्यांना विचारांची शिदोरी

सिन्नर, 15 मे (हिं.स.)।

- लग्नसमारंभ म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते पाहुण्यांच्या स्वागतासाठी बांधले जाणारे फेटे, पाहुण्यांच्या नावाचा बडेजाव आणि स्टेजवर होणारी गर्दी. मात्र, या रूढ झालेल्या समीकरणाला छेद देत सोनोशी (ता. संगमनेर) येथील गिते आणि खंबाळे (ता. सिन्नर) येथील आंधळे परिवाराने आपल्या पाल्यांच्या विवाहात 'पुस्तक वाटप' करून समाजात एक नवा पायंडा पाडला आहे. 'फेट्याचा मान' बाजूला सारून पाहुण्यांना 'ज्ञानाची भेट' देणाऱ्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.सोनोशी येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गिते यांचे चिरंजीव बाळासाहेब आणि अनिल आंधळे यांची कन्या शुभांगी यांचा विवाह सोहळा नुकताच नांदूर शिंगोटे येथे पार पडला. या मंगल प्रसंगी उपस्थित ७०० हून अधिक पाहुण्यांना फेटे बांधण्याऐवजी वैचारिक व प्रेरणादायी पुस्तके देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधींचे 'सत्याचे प्रयोग', उत्तम कांबळे यांचे 'आई समजून घेताना', कॉ. गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता?', अच्युत गोडबोले यांचे 'किमयागार' आणि अरविंद जगताप यांच्या 'पत्रास कारण की' यांसारख्या प्रसिद्ध पुस्तकांचा समावेश होता.

गिते परिवाराने सामाजिक भान जपण्याची ही पहिलीच वेळ नाही. तीन वर्षांपूर्वी एका कौटुंबिक लग्नात त्यांनी ११११ केशर आंब्यांच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला होता. त्याच प्रेरणेतून यावेळेस समाजाची वैचारिक भूक भागवण्यासाठी 'पुस्तके वाटण्याचा' महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हा विवाह सोहळा केवळ पुस्तक वाटपामुळेच नव्हे, तर त्याच्या शिस्तबद्ध आयोजनामुळेही लक्षवेधी ठरला. लग्न सोहळा अगदी ठरलेल्या वेळेत पार पडला. स्टेजवर अनावश्यक गर्दी टाळण्यात आली होती. विशेष म्हणजे, फ्लेक्स आणि प्लास्टिक बॅनरला फाटा देऊन पारंपरिक फलक लेखनाचा वापर करण्यात आला होता. या आनंदाच्या निमित्ताने 'विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे' या संस्थेला भोजन निधीही देण्यात आला. 'वऱ्हाडी' जेव्हा 'वाचक' होतात, तेव्हाच समाज खऱ्या अर्थाने समृद्ध होतो, हेच या अनोख्या विवाह सोहळ्याने सिद्ध केले आहे. डोक्यावरचा फेटा काही वेळातच बाजूला ठेवला जातो, मात्र हातात पडलेले पुस्तक आयुष्यभरासाठी विचारांची शिदोरी ठरते, अशा भावना उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande