
नाशिक, 15 मे (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागात खेळणी व बाकडी (बेंचेस) बसवण्याच्या वार्षिक ठेका निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. विशिष्ट ठेकेदारांच्या फायद्यासाठी ‘रिंग’ करून जाचक अटी टाकल्याचा दावा करत अनेक ठेकेदारांनी प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सुमारे १० ठेकेदारांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे लेखी तक्रार करत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या निविदेत १३ पैकी ११ ठेकेदार पात्र ठरले होते आणि त्यांनी १० टक्के कमी दराने काम करण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र ही निविदा कोणतेही स्पष्ट कारण न देता रद्द करण्यात आली.
त्यानंतर तब्बल १८ महिन्यांनी काढण्यात आलेल्या नव्या फेरनिविदेत एका वर्षातील ७५ लाख रुपयांच्या उलाढालीची अट वाढवून ३०० लाख रुपये करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बदलामुळे केवळ चार कंपन्याच स्पर्धेत उरल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.
नव्या निविदेत दर जुन्या निविदेपेक्षा अधिक असल्याने महापालिकेला आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.
तत्कालीन अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी यापूर्वी ही निविदा रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यांच्या बदलीनंतर प्रक्रिया पुन्हा पुढे नेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित ठेकेदारांनी विविध अधिकाऱ्यांकडे तक्रारी सादर करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आता उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV